रत्नागिरी, ता. २६ जून : संगमेश्वर तालुक्यातील फुंगुस, भद्रपुरवठार येथे कपाटाखालून कोयती काढत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे घडली.
वसंत महादेव शिंदे (वय ६५, रा. फुंगुस, भद्रपुरवठार, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, वसंत शिंदे हे आपल्या राहत्या घरात कपाटाखालून कोयती काढत असताना त्यांना अचानक विषारी सापाने दंश केला.
कुटुंबीयांनी तात्काळ १०८ ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १९/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम (BNSS) १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 26/Jun/2025














