गुहागरमध्ये वृद्धा विहिरीत मृतावस्थेत आढळल्या; दोन दिवसांपासून होत्या बेपत्ता

गुहागर, ता. २६ जून : गुहागर तालुक्यातील झोंबडी, गुरववाडी येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह गावातील एका पडक्या घरामागील विहिरीत सापडला आहे. काल, २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.

हिरु धोंडू गुरव (वय ८५, रा. झोंबडी, गुरववाडी, ता. गुहागर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरु गुरव या २४ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला, परंतु त्या कुठेही सापडल्या नाहीत.

त्यानंतर, २५ जून रोजी गुहागर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद (नापत्ता रजि. नं. १०/२०२५) करण्यात आली होती. शोधकार्य सुरू असतानाच, झोंबडी येथील केशव दर्वे यांच्या पडक्या घराच्या पाठीमागील विहिरीच्या पाण्यात त्या मृतावस्थेत आढळून आल्या.

या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १८/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम (BNSS) १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गुरववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 26-06-2025