Breaking : रत्नागिरीत पहाटे तीन दुचाकी जाळल्याने खळबळ; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

रत्नागिरी, [२७ जून, २०२५] : आज पहाटेच्या सुमारास रत्नागिरी शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील पेठ किल्ला परिसरात अज्ञात समाजकंटकांनी तीन दुचाकी जाळल्याची घटना घडली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लावण्यात आली, ज्यात एक बुलेट, एक एक्सेस आणि एक ॲक्टिवा या तीन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या पेठ किल्ला परिसरात तणावाचे वातावरण असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेमुळे रत्नागिरी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, लवकरच आरोपींना जेरबंद करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन दिले आहे.