सर्पदंश झालेल्या सान्वी पडवेकरची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

खेड : नियतीच्या फेऱ्यात एक चिमुरडी सापडली अन् एक कळी उमलण्याआधी कोमेजून गेली. खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी येथील सात वर्षीय सान्वी संदेश पडवेकर या बालिकेचा जीवनप्रवास सर्पदंशाने थांबला. तिला झालेला सर्पदंश अखेरच्या क्षणी निदर्शनास आला; मात्र तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता. तब्बल १२ दिवस सान्वीची सुरू असलेली मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

सान्वी १० जूनला शाळेतून परतल्यानंतर संध्याकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. त्याच वेळी घराच्या पडवीत साप आल्याचे तिला दिसल्यामुळे तिने आरडाओरड करून घरातल्या माणसांना माहिती दिली; मात्र या गडबडीत तिला सापाने दंश केला होता. हे तिलादेखील समजले नाही. त्यानंतर ती खेळण्यात मशगूल झाली. त्यामध्ये ती पडली अन् तिच्या डोक्याला खरचटले अन् दातालादेखील लागले होते.

दरम्यान, सान्वीच्या आई-वडिलांनी तत्काळ जवळच असलेल्या लोटे येथील हॉस्पिटलमध्ये सान्वीला दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना तिचा दात काढण्यात आला. त्यानंतर तिला रक्तस्त्राव सुरू झाला. तो थांबतच नव्हता अखेर तिच्या रक्तामधील पेशींची तपासणी केली असता तिच्या पेशी २३ हजारांवर आल्याने तिला अन्यत्र हलविण्याच्या सल्ला देण्यात आला. त्यानुसार तिला कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी घरी सर्प, विंचू असे काही आढळून आले होते का? अशी विचारणा केली. त्याला त्यांनी होकार दिला.

सान्वीदेखील तिथेच खेळत होती, असे सांगितले. तेव्हा तिला सर्पदंश झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तिच्यावर १४ जूनपर्यंत उपचार सुरू होते; मात्र त्यानंतर तिला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना तिची १२ दिवसांनी २२ जूनला प्राणज्योत मालवली. सान्वी जिल्हा परिषद शाळा दाभिळ जांभूळवाडी या शाळेतील दुसरीमध्ये शिकत होती. तिच्या पश्चात आई-वडील व बालवाडीत शिकणारा एक भाऊ असा परिवार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 27/Jun/2025