रत्नागिरीत माणुसकीचा आदर्श: ८५ वर्षीय विमल पेडणेकर यांचे मरणोत्तर देहदान!

रत्नागिरी, २६ जून २०२५ : रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (२६ जून २०२५) आठवडभरात सातवे मरणोत्तर देहदान करण्यात आले. श्रीमती विमल शंकर पेडणेकर (वय ८५, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांचे वृद्धापकाळाने २५ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील अतिदक्षता विभागात निधन झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.

श्रीमती विमल पेडणेकर यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी श्रीमती माधवी मधुकर नाखरेकर यांनी एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी आणि संशोधनासाठी विमल पेडणेकर यांच्या देहाचा उपयोग व्हावा, या उदात्त हेतूने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केले.

या देहदान प्रक्रियेदरम्यान श्रीमती विमल पेडणेकर यांच्या नात सौ. मंजिरी नाखरेकर, नातजावई सुहास पालेकर, सागर भिंगारे आणि शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, मिथिलेश मुरकर आणि मिहिर लोंढे यांनी या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

श्रीमती विमल पेडणेकर यांच्या या देहदामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानवी शरीररचना समजून घेण्यास आणि पुढील संशोधनासाठी मोठी मदत मिळणार आहे. त्यांचे हे कार्य समाजात देहदानाबाबत जनजागृती करण्यास निश्चितच प्रेरणा देईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 27-06-2025