अमली पदार्थांबाबत सजग राहा : पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे

लांजा : दिवसेंदिवस अमली पदार्थांचा विळखा वाढतो असून, आजची तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जाताना पाहायला मिळते आहे. त्यामुळे समाजत वावरताना आजच्या विध्यार्थ्यांनी, युवावर्गाने सजग राहायला हवे, असे प्रतिपादन लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी गुरुवारी श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे केले.

२६ रोजी जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येथे विद्यार्थ्यांसाठी ‘जाणीव जागृतीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी लांजा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय जाधव, वेरवली बुद्रुकचे पोलिस पाटील प्रभाकर कुळये, साक्षी जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण डोळे, प्रा. डॉ. कालिदास पिसे, ज्येष्ठ शिक्षक सचिन कांबळे, विनोद बंडगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते लेखणी देऊन स्वागत करण्यात आले.

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बगळे यांनी अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनांची सुरुवात कशा प्रकारे होते व पुढे ती सवय कशी बनते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बंडगर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 27/Jun/2025