चिपळूण : कोयना धरण पायथा विद्युतगृह प्रकल्पासाठी ८६२ कोटींची तरतूद

चिपळूण : कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसासिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. वाढत्या मागणीच्या कालावधीत अतिरिक्त विद्युतनिर्मिती करणे तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर, २४४० मे. वॅट) या योजनेचे नियोजन करण्यात आले. २०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प, सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले आहे.

त्यानुसार हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला गेला आहे. या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक १ हजार ३३६ कोटी ८८ लाखांपैकी ८६२ कोटी २९ लाख रुपयांच्या तरतुदीला प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित खर्चाची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना (ताकारी-म्हैसाळ) या योजनांसाठी २० टीएमसी पाणी विद्युतनिर्मिती करून सोडले जाणार आहे. प्रकल्पाद्वारे २७७.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:57 pM 28/Jun/2025