लांजा : तालुक्यातील कोलधे-कुंभारवाडी येथे अनिल तांबे दुकान ते कुंभारगावाकडे जाणाऱ्या वहाळावरील मोडकळीस आलेला लोखंडी साकव बुधवारी (ता. २५) झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. त्यामुळे कुंभार गावाचा कोलधे गावाशी असलेला संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
कोलधे येथील अनिल तांबे ते कुंभारगावाकडे जाणारा १५० मीटर लांबीचा वहाळावरील साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. साकवाची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत होते; पण त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. मुसळधार पावसामुळे आंबा कलमाची फांदी पडल्याने अखेर २५ जूनला सकाळी ११ च्या सुमारास साकव पूर्णपणे मोडून पडला. दरम्यान, घटना घडली त्यावेळी साकवाजवळ असणारी व्यक्ती बालंबाल बचावली.
साकव कोसळल्याने कुंभार गावाचा कोलधे गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे शाळा, दुकान व पोस्टाच्या कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ग्रामस्थांकडून गेले अनेक वर्षे पुलाची मागणी सातत्याने करण्यात येत होती; परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका अखेर कोलधे ग्रामस्थांना बसला आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल अपघाताची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामध्ये पर्यटकांचा मृत्यूही झाला होता. ही घटना ताजी असतानाच कुंभार गावाकडे जाणारा साकव कोसळला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. साकव कोसळल्याने परिसरातील ग्रामस्थांची मात्र अडचण झाली आहे.
तातडीने नवा साकव बसवा
तालुक्यातील कोलधे कुंभारवाडी येथील कुंभार गावाकडे जाणारा वहाळावरील लोखंडी साकव बुधवारच्या मुसळधार पावसात कोसळला. यावेळी एक जण सुदैवाने बचावला. साकव कोसळल्याने कुंभार गावचा कोलधे गावाशी असलेला संपर्क तुटला. हा साकव मोडकळीस आला असून, त्याची दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल. साकव नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नवा साकव बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 27/Jun/2025














