‘वाढीव टप्प्या’साठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक; शरद पवारांचे शिक्षक समन्वय संघाला आश्वासन

सावर्डे : राज्यातील अंशतः अनुदान तत्त्वावर सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णयानुसार १ जून २०२४ पासून वाढीव टप्पा अनुदान मिळावे आणि शासननिर्णयाची अंमलबजावणी व्हावी, या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वयकांनी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्या शिक्षकांना दिले.

शासन मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचे १८ जूनपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. यावेळी अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रा. संतोष वाघ, प्रा. श्रीकांत लाकडे आदी उपस्थित होते. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने टप्पा वाढीचा शासननिर्णय जारी केला आहे. अद्याप या शासन निर्णयावर कार्यवाही झालेली नाही.

१४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानंतर तीन अधिवेशनं झाली. या अधिवेशनात आर्थिक तरतूद झालेली नाही. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांना उपोषणं करावी लागतात. ही गंभीर बाब असल्याचे उपस्थितांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. पवार या यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना संपर्क केला. या वेळी अर्थखात्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक करूयात, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 27/Jun/2025