गुहागर : आणीबाणीकाळात लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र संघ कार्यकर्त्यांनी समाजात आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला, असे अनुभव नाना पाटणकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी नानांची भेट घेवून त्यांचा सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.
गुहागरातील अण्णा दामले, तात्या वझे, मधुकाका परचुरे, केशवकाका भावे, पांडुरंग तथा दादा शिरगांवकर, दांडेकर आदी 7 जणांना मिसा खाली अटक झाली होती. तर सुशीलाबाई खरे, प्रमोदकाका सैतवडेकर, शशिनाना बिर्जे अशा काहीजणांना आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला म्हणून अटक झाली होती. दादा शिरगांवकर यांची 4 दिवसाच्या पॅरोलवर सुटका होवून ते पालशेतला आले. पण घरी बसले नाहीत. अटक केलेल्या सर्वांच्या घरी भेटण्यासाठी आम्ही प्रवास केला. असोरेतील पद्माकर निमकर यांच्या घरी गेलो तेव्हा निमकरांच्या घराचे दार मोटरसायकलच्या आवाजाने बंद झाले होते. अखेर दादा शिरगावकरांनी वहिनींना नेहमीच्या पठडीतील हाक मारली तेव्हा घराचे दरवाजे उघडले. पण दादा नेमका काय निरोप घेऊन आले असतील असा विचार करत, थरथर कापत वहिनी ओटीच्या दारात उभ्या होत्या. ही होती आणीबाणीची दहशत असा किस्सा नाना पाटणकर यांनी सांगितला.
मधुकाकांचा किस्सा सांगताना नाना म्हणाले की, आपल्याला अटक होणार याची कुणकुण लागतात मधुकाका पोलिसांचा ससेमिरा चुकवून मुंबईला त्यांच्या भावाकडे गेले. तिथे झालेल्या गप्पांमध्ये पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय झाला. मात्र मुंबईत पोलिसांना शरण न जाता मधुकाका पुन्हा चलाखीने गुहागरला आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. संघाचे पदाधिकारी असलेले दांडेकर सर यांना पोलिसांनी अटक केली.
सदाशेठ आरेकरांविषयी बोलताना नाना म्हणाले की, या काळात काँग्रेसचे गुहागरमधील प्रभावी नेते सदाशेठ आरेकर यांची भूमिका कौतुकास्पद होती. ठरविले असते तर सदाशेठ आपल्या विरोधकांना धडा शिकवू शकले असते. मात्र तसे न करता त्यांनी गुहागर पोलिस ठाण्यात निरोप दिला होता, ‘तुम्ही अटक करत असलेली मंडळी ही गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठीत मंडळी आहेत. अटक करताना त्यांचा अपमान करु नका. कोठडीत त्यांना मारहाण होता कामा नये.’ यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष मंगेश रांगळे, माजी नगरसेवक उमेश भोसले, तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष सांगळे, भाजयुमाचे शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 27-06-2025












