रत्नागिरी : एकात्मिक खत व्यवस्थापनातून उत्पादन वाढवा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

रत्नागिरी : भात उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युरियाला पर्यायी खतांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भात पिकासाठी शिफारस केलेल्या एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

भात पिकासाठी प्रति हेक्टरी १०० किलोग्रॅम नत्र, ५० किलोग्रॅम स्फुरद आणि ५० किलोग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश, दुसरा हप्ता फुटवे फुटण्याच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि तिसरा हप्ता पिक फुलोऱ्यात असताना हेक्टरी २० किलो नत्र या शिफारशीनुसार वापर करावा असेही
सांगण्यात आले.

रासायनिक खतांसाठी पर्याय
चिखलणी करताना हेक्टरी १० टन गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा, यामुळे नत्राची गरज पूर्ण होण्यास मदत होईल किंवा जर चिखलणीच्या वेळी हेक्टरी ५ टन गिरीपुष्पाचा पाला वापरला तर शिफारस केलेल्या नत्राच्या मात्रेमध्ये ५० टक्के कपात करावी.

जैविक खतांचा असा करा वापर
रोप प्रक्रिया भात रोपे लावण्यापूर्वी ५०० मिली द्रव सुझोटोबॅक्टर १५ ते २० लिटर पाण्यात मिसळावे
भिजवण्याची पध्दत या द्रावणात २१ ते ३० दिवसांची निरोगी रोपे २० ते ३० मिनिटे भिजवून ठेवावीत
लागवड – द्रावणात भिजवून ठेवल्यानंतर एक तासाने या रोपांची लागवड करावी.
फायदे अॅझोटोबॅक्टर हे नत्र स्थिरीकरणाचे काम करते. यामुळे सुमारे २० ते २५ टक्के खताची बचत होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

अशी करा फवारणी
भात पिकावर हे पाण्यात विरघळणारे खत विविध तीन टप्प्यामध्ये वापरावयाचे असते. पहिली वेळ पिकाच्या फूटवाच्या वेळेस, दुसरी वेळ पीक फुलोऱ्यावर आल्यावर आणि तिसरी वेळ भात पिकाच्या दाणे भरण्याची वेळ. प्रत्येक फवारणीच्या वेळेस प्रति ५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात या प्रमाणात वापरावे.

कृषी विभागाच्या वतीने दिलेल्या उपाययोजनांचा वापर केल्यास रासायनिक खतांवरील खर्च कमी होवून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा-शिवकुमार सदाफुले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 27/Jun/2025