रत्नागिरी : कृषी महाविद्यालय, दापोली अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोळंबे गावात कार्यरत असलेल्या “मृदसुत” गटाच्या वतीने दिनांक २६/०६/२०२५ रोजी गावातील फणसवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत फडणीस यांच्या शेतावर नारळ खत व्यवस्थापन (रिंग पद्धत) व सुपारी बागेत मिरी आंतरपीक लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
प्रथम, नारळासाठी रिंग पद्धतीने खत व्यवस्थापन कसे करावे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी ९:२४:२४ संमिश्र खत, युरिया आणि म्युरिएट ऑफ पोटॅश यांचा वापर करण्यात आला. एका झाडासाठी वर्षभरासाठी १००० ग्रॅम नायट्रोजन, ५०० ग्रॅम स्फुरद आणि २००० ग्रॅम पालाश देण्याच्या डॉ. बा. सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार प्रमाण सांगण्यात आले. स्फुरद एकदाच जून महिन्यात पूर्ण प्रमाणात देण्यात येतो. तर नत्र व पालाश हे जून, सप्टेंबर व फेब्रुवारी या महिन्यांत ३ समान भागांत विभागून दिले जातात. रासायनिक खतांसोबत जून महिन्यात ५० किलो ग्रॅम कंपोस्ट किंवा शेणखत दिले जाते.
यानंतर सुपारीच्या बागेत मिरी (पन्नीयूर-१ जातीची) आंतरपीक लागवड कशी करावी, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मिरी वेली सुपारीच्या खोडाला आधार घेऊन लावण्यात आल्या. रोपांची निवड, योग्य अंतर, सुतळीचा आधार, छायानियंत्रण, पाणी देणे आणि किड व रोग नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या दोन्ही प्रात्यक्षिकांमध्ये एकूण १३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी या तंत्रज्ञानाबाबत उत्स्फूर्तपणे शंका विचारल्या व प्रत्यक्ष अनुभव घेतला. ह्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्याकरिता कृषी महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे केंद्रप्रमुख डॉ. किरण माळशे, विषय विशेषज्ञ डॉ. महेश कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ.
संतोष वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
ह्या उपक्रमात प्रणव देसाई, विजय दराडे, विपुल डोंगरकर, ओंकार फराडे, राजवर्धन गायकवाड, सुमित भादवे, वेदांत गिरी, सार्थक दिवाळे, आकाश गावडे आणि संकेत देशपांडे ह्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
“मृदसुत” गटाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नारळ व मिरीसारख्या नगदी पिकांतून अधिक उत्पादन व आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 27/Jun/2025









