आवाशी : खेड तालुक्यातील लोटे- घाणेखुंट बाजारपेठेसह संपूर्ण पंचक्रोशी परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे अनेक कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्रामीण भागातील ग्राहकांची कुचंबणा होत आहे. गेले महिनाभर सुरु असलेल्या या प्रकारामुळे परिसरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
यावर्षी मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे महावितरणच्या देखभाल दुरुस्तीवर – त्याचा परिणाम झाला. अवेळी पडलेल्या पावसाने जूनच्या सुरुवातीला थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे महावितरणकडे डागडुजी व देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा अवधी मिळाला होता. तरीही मे अखेरपासून सुरु असलेला विजेचा लपंडाव अद्यापही सुरु आहे.
खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथे औद्योगिक वसाहत असल्याने राष्ट्रीय बँका, खासगी बँका, पतसंस्था, खासगी कार्यालये, हॉटेल, गॅरेज, पेट्रोलपंप यांसह स्थानिक बाजारपेठ आहे. मात्र, दिवसातील निम्म्याहून अधिक काळ येथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. महावितरणच्या लोटे उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्वच भागात या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक गावागावातील वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे ही नुकसान होत आहे. वैद्यकीय दवाखान्यात व रुग्णालयातही रुग्णांची कुचंबणा होत आहे. यातून औद्योगिक वसाहत ही सुटलेली नाही. याबाबत सातत्याने वीज वितरण कार्यालयाशी संबंधित आस्थापना संपर्क ठेवून आहेत. मात्र, महिना लोटला तरी त्यात सुधारणा होण्याची कोणतीच चिन्हे दिसलेली नाहीत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 27/Jun/2025













