रत्नागिरी : जिल्ह्यात आजपासून माकडे पकडण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी

दापोली : जिल्ह्यात माकडांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला असून, २६३ ठिकाणी माकडांचे वास्तव्य सापडले आहे. गेली वर्षभर ही मोहीम वाडी वस्तीवर आणि जंगल भागात जाऊन वन विभागाने यशस्वीपणी राबवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४ हजार माकडांची नोंद करण्यात आली आहे. या माकडांना पकडण्यासाठी १५ ऑक्टोबर म्हणजे आजपासून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी हिमाचल प्रदेशमधील तन्हांचे पथक जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी सांगितले.

कोकणाचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. बागायती शेतीतून मिळणाऱ्या उत्पनांवर शेतकरी कुटुंबांची गुजराण होते. मात्र माकडांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी माकडांना पकडण्याची मोहीम रत्नागिरी जिल्हाभरात हाती घेण्यात येणार आहे. प्राण्यांपासून शेती वाचवण्यासाठी भारतीय किसान महासंघ, कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. भयमुक्त शेतीसाठी वानर, माकडांचा बंदोबस्त, करा अन्यथा गोळ्या घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत हजारो शेतकरी दापोली वन विभागाच्या कार्यालयावर धडकले होते. यावेळी गिरिजा देसाई यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी त्यांनी लवकरच जिल्ह्यात माकडे पकडण्याची मोहीम राबवली जाईल, असे आश्वासन दिले होते.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन सरकारने वानर, माकडांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला. त्यानंतर वानर, माकडांथा बंदोबस्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वन विभागाच्या माध्यमातून माकडांना पकडण्यात येणार असून, त्यांना सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

त्यानुसार जिल्ह्यात माकडांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, माकडांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार हजार माकडांची नोंद करण्यात आली असून, त्यांना १५ ऑक्टोबरपासून पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

शेतीबरोबरच घरांचेही नुकसान
वानर, माकडांमुळे शेतीचे नुकसान तर होतच आहे शिवाय घरावरील नळे, पत्रे, पाईप तोडणे, घरात शिरून नासधूस करणे, माणसांच्या अंगावर येणे हे प्रकार सुद्धा प्रचंड वाढले आहेत. हा त्रास पूर्वी सुद्धा होता पण कमी होता. गेल्या साधारणपणे पस्तीस वर्षात वानर माकडे मारणे बंद झाले. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आज ही जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे.

शेतकरी शेती, बागायतींपासून दूर
माकडांच्या उपद्रवामुळे कोकणातील शेतकरी शेती, बागायती सोडून देत आहेत. प्रचंड कष्ट करून आणि पैसे खर्च करून पदरात काहीच पडणार नसेल तर शेती बागायती करायची कशाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंबा बागेसाठी क्षेत्रानुसार एक ते दोन माणसे राखणीसाठी ठेवावी लागत आहेत. त्यांना वेतन देताना मोठा खर्च करावा लागत आहे.

माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे. माकडांकडून शेतीचे नुकसान पाहता वन विभागाने माकड रेस्क्यू मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गिरजा देसाई विभागीय वन अधिकारी निरीक (चिपळूण)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 15/Oct/2024

माकडे