माखजन : देशावर होणारी आक्रमणे, समाजात चालू असलेल्या विविध वाईट घटना ह्या फार वेदनादायी आहेत. या दुःशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी लढण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करा, सशक्त करा असे आवाहन निवृत्त कृषी विस्तार अधिकारी हेमंत तांबे यांनी केले. ते माखजन इंग्लिश स्कूल येथे पालक सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशालेत सात दिवसाचे, मुलांसाठी लाठी काठी प्रशिक्षण होणार आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकांना आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे, माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव दीपक पोंक्षे, सहसचिव दीपक शिगवण, मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की एखादं संकट उभ ठाकल तरी आपल्या मुला, मुलींना प्रतिकार करण्याची कला अवगत असली पाहिजे. पुढचा काळ कठीण असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांना नुसता लाठी काठी नव्हे तर तलवार चालवण्याचे प्रशिक्षण, दाणपट्टा फिरवण्याचे प्रशिक्षण, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण आपल्या प्रशालेत घेऊ असे नमूद केले.
सशक्त भारतासाठी हे संस्कार आज विद्यार्थ्यांवर करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवड किती महत्वाची आहे हे सांगताना, आईसाठी एक झाड असे भावनिक साद घालणारे उपक्रम शासनाला राबवावे लागतात हे आपलं दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली. प्रत्येकाने वृक्षारोपण केलेच पाहिजे. आणि वृक्षारोपण करण्यास कुणी इच्छुक असेल तर आपण वृक्ष देण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान यावेळी लाठी काठी प्रशिक्षणाचे महत्व श्रीनिवास पेंडसे यांनी देखील सांगितले.
दरम्यान, नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर संस्था अध्यक्ष किशोर साठे यांनी व मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या सभेला बहुसंख्य पालक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी शाळेच्या शिस्तीविषयी व अन्य उपक्रमांविषयी माहिती दिली व सभेचे सूत्रसंचालन केले.
दरम्यान या सभेवेळी यावर्षी च्या दहावी व बारावी बोर्डाचा निकाल घवघवीत लागल्याने १२ वी चे वर्गशिक्षक प्रा मनोजकुमार नार्वेकर, प्रा संजय सूर्यवंशी, प्रा सौ मालती गुरव, तर १० वी चे वर्गशिक्षक महादेव शिंदे, अमोल पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 27/Jun/2025









