चिपळूण : तालुक्यातील मोरवणे खांदाटपाली येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिला शकुंतला ही मूळची जानवळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी होती. ती पतिसोबत मोरवणे खांदाटपाली येथेराहत होती. तिचे वडील विनायक जयसिंग राठोड (वय 55 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 जून 2025 रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान, शकुंतलाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी विनायक राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शकुंतलाचा पती अशोक मोतीराम चव्हाण याचे त्याच्या कामावर काम करणाऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. अशोक हा शकुंतलावर वारंवार जबर मारहाण करत असे.
तसेच सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण ही तिला सतत शिवीगाळ करत असे आणि “माझ्या घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही” असे म्हणून मानसिक त्रास देत असे. या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून शकुंतलाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी 26 जून 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजून 6 मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 108, 85 आणि 3 (5) प्रमाणे पती अशोक चव्हाण व सासू कमलाबाई चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 27/Jun/2025














