सावर्डे बाजारपेठेत उभ्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूस दुचाकीची धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अजय अशोक सुतार (वय २९, वालोटी) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालक पृथ्वी बाबूनाथ (वय ४५, राजस्थान) याच्यावर सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

अजय सुतार हा दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेमार्गे संगमेश्वर येथे जात होता; तर गोव्याच्या दिशेने निघालेला ट्रक बाजारपेठे येथे रस्त्यालगत उभा होता. अजय सावर्डे मोटारसायकलवरून बाजारपेठ येथे आला असता त्याने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात अजय गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती सावर्डे पोलिसांना मिळताच त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अजय सुतार याचा मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आला. या अपघातप्रकरणी ट्रक चालक पृथ्वी बाबूनाथ याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 28/Jun/2025