संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून आरवलीपासून पूर्वेकडील गावांना जोडणारा आरवली ते येडगेवाडी प्रमुख जिल्हामार्गाची रुंदी वाढवून तो दुपदरी करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या रस्त्यावरील गडनदी धरण प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओघ वाढत असल्यामुळे वाहनांची रेलचेल अधिक होत असते.
आरवली ते येडगेवाडी हा रस्ता आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, येडगेवाडी प्रमुख जिल्हामार्ग क्र. ४४ म्हणून अस्तित्वात आहे. हा रस्ता एकेरी असून, या मार्गाची रुंदी वाढवून दुपदरी करण्याच्यादृष्टीने या संपूर्ण ३३ कि. मी रस्त्याच्या लांबीला हायब्रिड अॅन्युटो मॉडेल (HAM) मधून मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हसकर यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे. आरवली-येडगेवाडी प्रमुख जिल्हामार्गक्र. ४४ हा आरवली येथून सुरुवात होऊन येडगेवाडी, गायकवाडवाडी येथपर्यंतच आहे. गायकवाडवाडी ते नेरववाडी हा रस्ता प्रस्तावित असून, पुढे नियोजित संगमेश्वर-पाटण घाटमार्गाला जोडण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. पुढील काही वर्षांचा विकास आराखडा लक्षात घेता प्रमुख जिल्हामार्ग क्र. ४४ हा रस्ता दुपदरी करणे अनिवार्य आहे, असे येडगे यांनी सांगितले.
आरवली येडगेवाडी या रस्त्यावर केंद्र व राज्यशासनाच्या वतीने तयार झालेला एक हजार १५१ कोटी रुपयांचा गडनदी धरण प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. गडनदी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निविदांची कामे पूर्ण झाली असून, वीजनिर्मिती सुरू करण्याबाबत शासनसारावर हालचाली सुरू आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता आरवली-येडगेवाडी प्रमुख जिल्हामार्ग हा पर्यटन आणि वाहतुकीच्यादृष्टीने अपग्रेड करण्याची मागणी वाढत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 28/Jun/2025














