रत्नागिरी : फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये २०२३-२४ मध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ झाला. कार्यक्रमासाठी डॉ. मिलिंद पडळकर आणि मनोज भांडुरगे प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फिनोलेक्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. पडळकर यांनी विद्यार्थीदशेतल्या नेतृत्व आणि समाधीटपणाचा उपयोग पुढे करिअरमध्ये कसा होतो, हे सांगितले. तसेच जिथे घडलो त्या महाविद्यालयाला विसरता कामा नये, असेही सांगितले. त्याचबरोबर जिद्द, चिकाटीही यश मिळवण्यासाठी कशी महत्त्वाची आहे या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
भांडुरगे यांनी नोकरी, व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबरच आवश्यक कौशल्ये विशद केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि एमसीए अशा विविध अभियांत्रिकी शाखांच्या सुमारे १७०हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
मंचावर डॉ. मिलिंद यादव, डॉ. संजय कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दर्शना बापट यांनी केले. आभार डॉ. संजय कुलकर्णी यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 28/Jun/2025














