मंडणगड : मंडणगड तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराला विरोध करत तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे हरकत घेतली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) मंडणगड तालुका शाखेतर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य व भूषणावह आहे. मंडणगड तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे. डॉ. आंबेडकरांच्या नावाने जगात मंडणगड तालुका ओळखला जात असल्यामुळे प्रशिक्षण संस्थेच्या सध्याच्या नावात बदल करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे तत्काळ बदल करावा अन्यथा आणि नाइलाजास्तव आंबेडकरी अनुयायांना तीव्र जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश साळवी, राजेश गमरे, राजेश खैरे, सागर खरे यांच्या सह्या आहेत. हे निवेदन बौद्ध समाजसेवा संघ, भारतीय बौद्ध महासभा आणि मंडणगड तालुक्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 15/Oct/2024









