राजापुरात ७० लाखांचे नुकसान

राजापूर : पूर्वमोसमी पावसानंतर नियमित सुरू झालेल्या पावसामुळे मे महिन्यातील पाणीटंचाईसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; मात्र गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जूनमध्ये जादा पडलेल्या पावसामुळे तालुक्यात नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये तालुक्यात ७० लाखांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे आपत्तीग्रस्त ग्रामस्थ नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे २३४ मिलिमीटर जादा पाऊस पडला आहे. मे महिन्यातच झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना वाढलेले पाणी, भूगर्भातील पाण्याची वाढलेली पातळी, वाढलेले नैसर्गिक जलस्त्रोत यामुळे मे महिन्यातील पाणीटंचाई संपुष्टात आली. त्यानंतर, नियमित पाऊस कायम राहिल्याने

खारेपातील शेतीच्या कामांनी जोर धरला. सद्यस्थितीमध्ये भातशेतीच्या लावणीच्या कामांची लगबग शेतांमध्ये दिसत आहे; मात्र या पावसाने तालुक्यात ७० लाखांचे नुकसान झाले आहे. घरे-गोठ्यांची पडझड झाली असून, वाडीवस्तीसह गावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. काही गावांमधील रस्ते वाहून गेले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालवणे आणि प्रवास करणे मोठे जिकिरीचे झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 28/Jun/2025