संगमेश्वर : कुरधुंड्यात कोसळलेल्या संरक्षक भिंतीजवळील रस्ता बंद

संगमेश्वर : तालुक्यातील कुरधुंडा येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत यासंबंधित यंत्रणांनी केवळ काम सुरू आहे, असा फलक लावून रस्ताच बंद करून टाकला आहे.

हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर धार्मिक आणि कृषी दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. याच मागनि मुस्लिम बांधव दर्ग्याकडे जात असतात आणि पुढील भागात शेतशिवार आहे. रस्ता बंद असल्याने नित्यनेमाने जाणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली असा बेजबाबदारपणा सहन करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. प्रशासन, सत्ताधारी आणि स्थानिक नेते एक तर मौन बाळगून आहेत किंवा हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. पारदर्शकतेची ग्वाही देणारे सत्ताधारी अशा गंभीर प्रकरणावर चिडीचूप का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कुरधुंडा येथे संरक्षक भिंतीसमोर लावलेला फलक भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आहे की, काम लांबणीवर टाकण्यासाठी हे स्पष्ट होत नाही. मुंबई-गोवा महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अडथळे, ढिसाळ काम, अपूर्ण रचना आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम सातत्याने समोर येत आहे. हे केवळ अपव्यय नसून, जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अशा कामांच्या चौकशीस विलंब का, दोषींवर कारवाई कधी ? – परशुराम पवार, अध्यक्ष, प्रवासी वाहतूक संघटना, संगमेश्वर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 28/Jun/2025