चिपळूण तालुक्यातील शाळांचे पायाभूत सुविधांसाठी होणार परीक्षण

चिपळूण : तालुक्यातील शाळांमध्ये स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, शौचालय व अन्य पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि देखभाल यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत सहा महिन्यांत तालुक्यातील सर्व शाळांचे परीक्षण करण्यात येणार असून, प्रत्येक गटात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन शाळा/महाविद्यालयांना प्रजासत्ताकदिनी सन्मानचिन्ह आणि बक्षिसे प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी स्पष्ट केले.

तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत शिक्षणक्षेत्रात स्वच्छता, सुरक्षा, पर्यावरण आणि आपत्कालीन तयारी यांसह विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध आठ मुख्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

माझी शाळा स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त शाळा या संकल्पनेपासून सुरुवात करून ‘एक पेड माँ के नाम’ योजनेंतर्गत इको क्लब स्थापन करणे तसेच ड्रग्जमुक्ती अभियान प्रभावीपणे राबवणे यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोक्सो कायद्याचे पालन, शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आणि कर्मचारी पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि नियोजित व्हावी यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, एनडीआरएफचे अधिकारी संतोष चहादूर सिंग, शिक्षण विभागाच्या सशाली मोहिते, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

एनडीआरएफच्या मदतीने प्रशिक्षण
आपत्कालीनप्रसंगी विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे व्यवस्थापन सक्षमपणे कार्य करेल यासाठी एनडीआरएफच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे ठरले. शाळेजवळील पूल व साकवांची माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 28/Jun/2025