रायवळ आंब्याची लागवड करण्याचे आवाहन

रत्नागिरी : आंबा हा फळांचा राजा असून, भारतीयांच्या जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणात जगप्रसिद्ध हापूस आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चवीच्या रायवळ /गावठी आंब्याची लागवड कमी होऊ लागली आहे. त्यांचे महत्त्व कमी होऊन तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रायवळची
लागवड करा, असे आवाहन येथील पर्यावरण संस्थेने केले आहे.

संस्थेचे डॉ. दिलीप नागवेकर म्हणाले, इमारतीसाठी लाकूड, आंबा खोके, सरपण, छोट्या बोटी (होड्या) तयार करणे, रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने रस्त्यालगतची झाडे तोडली जातात. हापूस आंब्याची लागवड वाढवताना रायवळ आंब्याचे रूपांतर हापूसमध्ये करण्यात येते. कोकणातील अनेक गावांत दरवर्षी कमीत कमी एक रायवळ आंब्याचे झाड होळीसाठी तोडले जात असल्याने रायवळची झाडे कमी होऊ लागली. पूर्वीच्या काळी गावातून घरोघरी रायवळ आंब्याच्या आड्या लावल्या जात होत्या आणि त्याचा आस्वाद आबालवृद्ध घेत होते.

यासंबंधी पर्यावरण संस्थेचे संस्थापक, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले की, पूर्वीच्या पिढीने रायवळ आंब्याचा पूर्ण आस्वाद घेतला आहे. आताची पिढी काही प्रमाणात घेत असून, पुढील पिढीला तो घेता येण्याची शक्यता फारच कमी दिसून येते. आंब्याची निर्मिती ही आंब्याच्या कोयी (बाटा) पासून केली जाते. हे परागीकरण होणारे झाड असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. हापूस व अन्य आंबारोपांची निर्मिती रोपवाटिकेमध्ये केली जाते. गावठी आंबाझाडांची लागवड कोणी करत नाहीये. पूर्वीची आंबाझाडे ही नैसर्गिकरित्या उगवून, टिकून मोठी झाली आहेत. व्यावसायिक लागवड आवश्यक असली, तरी एक टक्का रायवळ आंबारोपांची लागवड करावी. देवस्थानाच्या जमिनी, शाळा परिसर, नवीन तयार होत असलेल्या महामार्गाच्या कडेला, नदीकिनारे या ठिकाणी ही झाडे लावावीत. प्रत्येक शेतकरी/बागायतदाराने किमान १० झाडे लावून जोपासावीत, असे ते म्हणाले.

कोया झुडपात टाका
ग्रामस्थांनी ठरवले, तर या पावसाळ्यात आंब्याच्या कोया (बाटा) जंगलातील झुडपात टाकून ठेवू शकतात जेणेकरून तेथेच रूजून येतील आणि झुडपामुळे त्यांचे संरक्षण होईल. त्याला पाणी देण्याची गरज भासणार नाही. दरवर्षी कोकणातील अनेक गावांत होळीसाठी रायवळ आंबा तोडला जातो. त्या ग्रामस्थांनीदेखील आतापासूनच आंब्याच्या झाडांची लागवड केली, तर पुढच्या पिढीला होळीसाठी आंब्याचे झाड शोधावे लागणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 28/Jun/2025