मराठीबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त करण्याचे धाडस एकनाथ शिंदेंमध्ये नाही : सुषमा अंधारे

पुणे : मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटतात, तेव्हा त्यांना चांगले वाटते. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे-उद्धवसेना एकत्रित मोर्चा काढतात, ते त्यांना रुचत नाही.

हा भारतीय जनता पक्षाचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका उद्धवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निदान भूमिका घेतली, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते धाडस नाही, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धवसेना राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत एकत्रित मोर्चा काढत आहेत. आधी मनसेने ६ जुलै ही तारीख जाहीर केली. त्यानंतर उद्धवसेनेने ७ जुलै, त्यानंतर मनसेने पुन्हा तारीख बदलून ५ जुलै केली. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मध्यस्थीने एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यावर पुण्यामध्ये पत्रकारांबरोबर बोलताना अंधारे यांनी यावर भाष्य केले.

अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्र आणि मराठी माणूस हेच शिवसेनेचे ध्येय आहे. त्यामुळे त्याबाबतीत आमच्याकडून कधीही, कसलीही तडजोड होणार नाही. हिंदी भाषेची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही सांगतात. मात्र, विद्यार्थ्यांना हिंदी वगळून जी दुसरी भाषा शिकायची असेल, तिचे किमान २० विद्यार्थी हवेत, त्या भाषेचे शिक्षक हवेत, ते नसतील तर ऑनलाइन शिकावे लागेल, ही आडवाटेने केलेली सक्तीच आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.

मराठीबद्दल राज्य सरकारला प्रेम असते, तर त्यांनी दोन महिने वाट पाहिली नसती. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे यांना ते शक्य होणार नाही, याचे कारण त्यांच्यात तेवढे धाडसच नाही, असे अंधारे म्हणाल्या. मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या, या भाषेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 28-06-2025