विद्यार्थ्यांनी गुण आणि मूल्येही जोपासावीत : आमदार शेखर निकम

चिपळूण : गुण हे यशाचं एक पाऊल असतं; पण मूल्य ही जीवनाची दिशा ठरवतात, अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करताना त्यांच्या यशाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कापसाळ येथील माटे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. शेखर निकम म्हणाले, आजच्या यशाचं श्रेय केवळ गुणांपुरते मर्यादित नसून, त्या मागे असलेली मेहनत, चिकाटी, संस्कार आणि पालक व शिक्षकांचे योगदानही तितकंच मोलाचे आहे. ते पुढे म्हणाले, परीक्षेत मिळालेले गुण हे अंतिम ध्येय नसावे. जीवनात अनेक संकट, स्पर्धा आणि अपयश येतील; पण त्यावेळी तुमचे मनोधैर्य, मूल्य आणि विचारशक्तीच उपयोगी ठरेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी स्पर्धा परीक्षा, मेहनतीचे महत्त्व आणि योजनाबद्ध अभ्यास याबाबत मार्गदर्शन केलं. पत्रकार सतीश कदम यांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिरेकावर भाष्य करत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. यावेळी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. भक्ती पवार हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातून दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, दादा साळवी, माजी सभापती सुरेश खापले, रिया कांबळे, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 28/Jun/2025