कांचन डिजिटलतर्फे यंदा बालमूर्तिकारांसाठीही गणेशमूर्ती बनविण्याची अनोखी स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटलतर्फे यंदा बालमूर्तिकारांसाठी गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती बनविण्याच्या एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३ ऑगस्ट रोजी शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरमध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी कांचन डिजिटलतर्फे आतापासूनच विशेष नियोजन करण्यात येत आहे.

कांचन डिजिटलतर्फे गेली ५ वर्षे रत्नागिरीतील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” आयोजित केली जात आहे. यंदाही ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची लोकप्रियता पाहता गणेशोत्सवानिमित्त बालमूर्तिकारांसाठीही स्पर्धा घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी कांचन डिजिटलकडे करण्यात येऊ लागली. त्यानुसार या मागणीचा मान ठेवत बालमूर्तिकारांतील कलागुणांना वाव देण्यासाठी कांचन डिजिटलतर्फे बालमूर्तिकारांसाठी यंदा प्रथमच गणेशमूर्ती बनविण्याच्या एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

घरगुती गणपती सजावट स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धाही आगळीवेगळी असणार आहे. या स्पर्धेसाठी बालमूर्तिकारांतील विजेत्यांना गणपती बाप्पाचा आशिर्वाद म्हणून खास बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच गणपती सजावट स्पर्धेच्या भव्य पारितोषिक वितरण सोहळ्यात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नसून मूर्ती घडविण्यासाठी माती कांचन डिजिटलतर्फे देण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. रा. भा. शिर्के हायस्कूलच्या रंजन मंदिर सभागृहात ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही स्पर्धा पार पडणार आहे.

बालमूर्तिकारांनी केवळ या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी होऊन आपल्या संकल्पनेतील सुबक मूर्ती हस्तकौशल्यातून साकारायची आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना मूर्तिकार दीपक नारायण भडेकर (संदेश आर्ट्स पेपर गणेशा) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर स्पर्धेनंतर तज्ज्ञ परीक्षकांतर्फे परीक्षण करून आकर्षक आणि अनोख्या मूर्तीना पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासूनच इयत्ता 5 वी ते 7 वीतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याच्या दृष्टीने तयारीला लागावे, असे आवाहन कांचन मालगुंडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8087296110 या नंबरवर संपर्क साधावा.

गणेशोत्सवानिमित्त बालमूर्तिकारांनी गणेशमूर्ती बनविणे स्पर्धा, तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच प्राथमिक बैठक रत्नागिरी येथे पार पडली. बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये स्वतः कांचन मालगुंडकर, तसेच मुकेश गुंदेचा, नरेंद्र पाटील सर, अभिजीत नांदगावकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, बाबू चव्हाण, शकील गवाणकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर सहभागी झाले होते. या बैठकीत दोन्ही स्पर्धांबाबत चर्चा करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 28/Jun/2025