मंडणगड : समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांमुळे वेळास-बाणकोट मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. लाटांनी वाहून आलेला कचऱ्याचा खच रस्त्यावर पसरत असल्याने त्यातून मार्ग काढणेही मुश्किल होत आहे. लाटांमुळे रस्त्याची धूप होऊन रस्ता नादुरूस्त होऊन वेळास गावाचा संपर्कच विस्कळीत होत आहे. बुधवारी उधाणाच्या लाटांनी पुन्हा एकदा रस्ता बंद होऊन वेळास गावाचा संपर्क तुटला होता.
‘कासवांचे गाव’ म्हणून मंडणगड तालुक्यातील वेळास गाव प्रसिद्ध आहे. मात्र, या गावाकडे जाणारी वाट दिवसागणिक खडतर होत चालली आहे. वेळास या ठिकाणी कासवांचा जन्मोत्सव पाहण्याकरिता देश-विदेशांतून पर्यटक येत असतात. या गावचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत असल्याने कासव महोत्सवाव्यतिरिक्त या ठिकाणी अन्य दिवशीही पर्यटकांची रेलचेल सुरू असते. वेळास गावाला जोडणारा बाणकोट ते वेळास या समुद्रालगत असलेल्या रस्त्याची उधाणामुळे दुरावस्था होत असल्याने येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.
रस्त्याला असलेली दगडांची संरक्षक भिंत नष्ट झाल्याने समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर येते. त्यामुळे पर्यटकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागतो. समुद्राच्या उधाणाच्या उसळलेल्या लाटा थेट रस्त्यावर येतात. या लाटांमुळे समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन पडतो. त्यामुळे या मार्गावर वाहन चालवताना फार जिकिरीचे ठरते. अनेक वर्षांपासून या मार्गाची उधाणामुळे दुरावस्थाच होत आहे.
बाणकोट-वेळास मार्गावर वाहतुकीला समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांचा नेहमीच फटका बसतो. त्यामुळे वेळास गावाचा तालुक्याशी संपर्क तुटतो. येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसते. शासनाने समुद्रालगत असलेल्या या मार्गावर धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर करून ही समस्या दूर करावी- हेमंत सालदुरकर, वेळास
धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी
बाणकोट-वेळास या मार्गाला समुद्रालगत धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी जुनीच आहे. आता मात्र येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सरकारने येथे धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर करावा. त्याचबरोबर रस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 28/Jun/2025














