मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली जाणार आहे. रविंद्र चव्हाण सध्या महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्ष आहेत. चव्हाण यांच्या नावाची घोषणा 1 रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने हे पद रिक्त आहे. यामुळे आता राज्य संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जानेवारी 2025 मध्ये त्यांच्याकडे राज्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.दरम्यान, भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जवळपास एक वर्षापासून रखडली आहे. ती प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह 12 राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीची घोषणा होणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीपुर्वी अनेक राज्यांच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने शुक्रवारी देशातील 3 राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक नेमले त्यानुसार केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची महाराष्ट्रचे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जून रोजी अर्ज भरतील. त्यानंतर सर्वानुमते मंगळवारी 1 जुलैला त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 1 जुलैला सकाळी ११ वाजता त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 28-06-2025














