रत्नागिरी : बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोअरची मागणी करत असेल, तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या अडीअडचणींसंदर्भात पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन काळात वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सिबिल स्कोअर मागून बँका त्रास देत असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना मिळवून देण्यासाठी तसेच जे साडेचार कोटी रुपये परत गेले आहेत, त्यासाठीदेखील वित्तमंत्री अजितदादांकडे एकत्रित बैठक घेतली जाईल. या बैठकीला सहकार मंत्र्यांनाही निमंत्रित करू. शेतकऱ्यांचे निश्चितपणे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.
यानंतर पालकमंत्र्यांनी सांडेलागवण व काळबादेवी गावातील भू संपादनाबाबत रेवस-रेडी महामार्गाबाबत, जेएसडब्ल्यू आणि ट्रक टर्मिनलच्या अडीअडचणीसंदर्भात योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 28-06-2025














