रत्नागिरी, [२८ जून २०२५] : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका संशयित आरोपीकडून तब्बल ८ ग्राम ‘ब्राऊन शुगर टर्की’ सदृश अमली पदार्थ जप्त केला आहे, ज्याची किंमत ४४,००० रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील माळ नाका ते एसटी कॉलनी रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस दप्तरी असलेला एक गुन्हेगार आपल्या मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने आणि त्याच्याकडे अमली पदार्थ असण्याची शक्यता असल्याने, दोन पंचांसमक्ष त्याची चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान, त्याच्या ताब्यात असलेल्या पिशवीत ‘ब्राऊन शुगर टर्की’ सदृश अमली पदार्थाच्या ८ ग्राम वजनाच्या एकूण ८८ पुड्या आढळून आल्या. या प्रकरणी, अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) याला पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४४,००० रुपये किमतीचा ‘ब्राऊन शुगर टर्की’ आणि १,४४,००० रुपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहेत.
ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्री. शेषराव शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री. सुभाष भागणे, तसेच पोलीस हवालदार श्री. शांताराम झोरे, श्री. बाळू पालकर, श्री. अमित कदम, श्री. गणेश सावंत, श्री. प्रवीण खांबे आणि श्री. सत्यजीत दरेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. रत्नागिरी पोलीस दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश येण्यास मदत होणार आहे.














