रत्नागिरी, २८ जून २०२६ : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, अलोरे शिरगाव पोलिसांनी चिपळूण तालुक्यातील पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे छापा टाकून एका व्यक्तीकडून सुमारे १४,००० रुपये किमतीचा ५८८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांना २७ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार केले. या पथकात पोहेकाँ गव्हाणे (११९७), पोहेकाँ यादव (१२२३), पोकों जगदाळे (३१८), पोकों फडतरे (१०२८), पोकों माने (२२९), तसेच एस. एम. लोटे (ग्रेड पोउनि), पोहेकाँ शेख (५०६) आणि मपोकाँ मुल्ला (६९५) यांचा समावेश होता. दोन पंचांसमक्ष या पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत, संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी, ता. चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५८८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत १४,००० रुपये आहे. संजय खरात विरोधात अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४६/२०२५ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कायद्याच्या कलम ८ (क) आणि २० (ब) (ii) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे आणि मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांनी केली आहे.














