राजापूर : नाटे बाजारपेठेत भीषण आग; सात दुकाने जळून खाक

नाटे : राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता सात दुकाने जळून खाक झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी अनेकांचे संसार पडले आणि लाखोंचे नुकसान झाले. मात्र, या आपत्तीच्या काळात नाटे गावातील तरुणांनी दाखवलेले धाडस आणि धर्मभेद विसरून मदतीला धावलेल्या गावकऱ्यांमुळे माणुसकीचे अनोखे दर्शन घडले.

राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीत ही सात दुकाने थाटली होती. रात्रीच्या शांततेत अचानक आगीच्या ज्वालांनी आणि धुराच्या लोटांनी परिसर व्यापला, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने, इमारत निवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच यातील दिलासादायक बाब होती.

तरुणांच्या शौर्याने अनर्थ टळला आगीची माहिती मिळताच, नाटे आणि साखरी-नाटे येथील तरुण जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी धगधगत्या आगीत आणि धुराच्या साम्राज्यात दुकानांच्या पत्र्यांवर चढून आत असलेले सात ते आठ गॅस सिलिंडर बाहेर काढले. यातील काही सिलिंडर भरलेले होते. जर यातील एकाचाही स्फोट झाला असता, तर संपूर्ण बाजारपेठ हादरली असती आणि दुर्घटनेची तीव्रता कित्येक पटींनी वाढली असती.

या तरुणांच्या धाडसामुळेच हा संभाव्य अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अश्वनाथ खेडेकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. राजापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल रात्री अडीचच्या सुमारास पोहोचले आणि सकाळपर्यंत अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, त्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल. या घटनेने नाटे बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले असले तरी, येथील सामाजिक सलोखा आणि एकजुटीने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

जळून खाक झालेली दुकाने….
दिगंबर गिजमः उपहारगृह (फर्निचर आणि किचन साहित्य जळाले)
भीम खंडीः चायनीज फास्ट फूड सेंटर
प्रदीप मयेकर: टेलरिंग शॉप (शिलाई मशीन आणि कपडे भस्मसात)
केदार ठाकूरः कापड आणि प्लास्टिक वस्तू विक्रीचे दुकान –
प्रसाद पाखरेः फोटो स्टुडिओ (कॅमेरे, संगणक आणि प्रिंटर जळाले)
निकिता गोसावीः ब्युटी पार्लर
नारायण गोसावीः कटलरी साहित्याचे गोदाम

माणुसकीच्या नात्याला सलाम या कठीण प्रसंगी मजीद गोवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धर्म, जातपात विसरून माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी रात्रभर आग विझवण्यासाठी पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला. ही केवळ आग नव्हती, तर माणुसकी जपण्याची एक संधी होती, या त्यांच्या शब्दांनी उपस्थितांची मने जिंकली.

दुर्घटनेत आशेचा उजेडासह एकात्मतेचे दर्शन !
ही दुर्घटना नाटे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या स्वप्नांवर काळा पडदा टाकणारी असली, तरी नाटे व साखरी नाटेतील युवकांनी दाखवलेले धैर्य, माणुसकी आणि एकात्मता या घटनेला आशेचा उजेड देणारी ठरली. आता स्थानिक प्रशासनाने या घटनेतील धाडसी युवकांचा गौरव करावा आणि पीडित व्यापाऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशी सर्वत्र अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 30/Jun/2025