चिपळूण : मालघर येथे पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (आरएडब्ल्यूई) उपक्रमांतर्गत मालघर गावात पिकांवरील कीड नियंत्रणासाठी कृषिदूतांद्वारे कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. डॉ. मोहिते यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांवरील कीड व रोग ओळखण्याच्या आणि त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. यावेळी कांबळे व वडगावे उपस्थित होते. कार्यशाळेत प्रोजेक्टरचा वापर करून विविध कीड व रोगांचे फोटो, लक्षणे आणि उपाय समजावण्यात आले. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून विविध प्रकारच्या किडींची ओळख पटवून दिली गेली.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा सविस्तर ऊहापोह केला. कीड नियंत्रण, सेंद्रिय उपाय, नवीन औषधे, पीक संरचना यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या कार्यशाळेत महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी केले. कृषिदूतांनी आयोजित केलेली ही कार्यशाळा म्हणजे गावकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक कृषी ज्ञान पोहोचवण्याचा एक यशस्वी प्रयत्न ठरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 30/Jun/2025