संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात भात लावणीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. पाणथळ भागातील शेतकरी मोठ्या उत्साहात पुनर्लागवडीची कामे करत आहेत. सध्या अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे भात लावणीसाठी पुरेसे पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र कातळावर पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांतील अनिश्चित पावसामुळे अनेक अडचणींना सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम आशादायक ठरत आहे. जूनच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वेळेवर शेतीची कामे पूर्ण करत आहेत. भाताची रोपेही चांगल्या प्रतीची आणि पुरेशी झाल्यामुळे लावणीची कामे जोरात सुरू आहेत. संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी पहाटेपासून शेतात उतरून लावणी करत असून, महिलांचा विशेष सहभाग आहे. महिलांच्या गाण्यांनी आणि गडगडाटी वातावरणात चालणाऱ्या या लावणीने खेड्यांमध्ये खरीप हंगामाचे स्वर गाजत आहेत.
यंदा लावणीची गती समाधानकारक असून, पाणी आणि रोपांचे व्यवस्थापन चांगले होत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत आणि बी-बियाणे उपलब्ध झाल्यामुळे यंदाचा हंगाम चांगला जाण्याची शक्यता आहे. यावर्षी वेळेवर आणि सुसंघटित पद्धतीने शेतीची कामे सुरू असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्यही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 30/Jun/2025














