चिपळूण : युरिया खताचा शिफारस मात्रानुसार खरेदी करण्याचे आवाहन

चिपळूण : खरीप हंगामाच्या सुरवातीलाच यावर्षी युरियाचा तुटवडा आहे. जूनमधील मागणीच्या तुलनेत कंपनीकडून तब्बल २५ टक्के कमी कमी युरिया खताचा पुरवठा झाला आहे त्यामुळे प्रशासनासमोर तुटवडा दर करून युरिया उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे.

तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरी खते खरेदीसाठी बाजारात चाचपणी करीत आहेत. शेतकऱ्यानी गरजेनुसार व कृषी विद्यापीठाच्या शिफारस मात्रानुसार पिकांना लागणाऱ्या खताची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे. तालुक्यात यावर्षी सात हजार ९२ हेक्टरांवर खरिपाची भातशेती होणार आहे. शेतीसाठी बियाणे, खते, किटकनाशकाचे नियोजन कृषी विागाने केले आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून यावर्षी भात बियाण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. तरीही हंगामाच्या सुरुवातीलाच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. चिपळूण तालुका खरेदी विक्री संघामार्फत पहिल्या टप्यात एक हजार किलो युरिया खताची विक्री होती. यावर्षी ७५० टन खत उपलब्ध झाले आहे.

२५० किलो खताचा तुटवडा आहे. विविध शासनमान्य संस्थांच्या माध्यमातून युरिया खत शेतकऱ्यांना विकले जाते. काही संस्था हे खत शेतकऱ्यांना न विकता थेट लोटेतील कारखानदारांना विकतात, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. काही राजकीय पक्षांनी यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. मात्र, युरिया खताचा तुटवडा कंपनीकडूनच असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. तसेच बेकायदा खत विक्री होत असेल, तर शेतकऱ्यांनी तक्रार करा, असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

अनेकवेळा शेतकरी युरिया खताचा साठा करतात. गरज एका पोत्याची असते, मात्र, दोन पोत्याची मागणी करतात. शेतकऱ्यांनी युरिया खताचा साठा करू नये. तसेच कारखानदारांना कोणी युरिया खताचा पुरवठा करत असेल, तर आम्हाला त्वरित कळवा. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. युरियाऐवजी अनेक पर्यायी खते उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करावा- शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

युरिया खताचा जास्त वापर केल्यास त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे मागील वर्षांपासून युरिया खताचा कमी वापर करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे यापुढे शंभर टक्के मागणी प्रमाणे युरिया खत येण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, इतर सर्व खते तालुका खरेदी-विक्री संघात विक्रीसाठी उपलब्ध आहेत-पांडुरंग कांबळी, व्यवस्थापक, चिपळूण तालुका खरेदी-विक्री संघ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 30/Jun/2025