रत्नागिरी : नवीन संचमान्यतेला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची भरतीप्रक्रिया पूर्ण थांबली आहे. त्याचा फटका शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बसत असून, अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सध्या ९०० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पटसंख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये शिक्षक कमी पडू नये यासाठी कमी पटाच्या शाळांमधील शिक्षकांना कामगिरीवर काढले जात आहे. याचा गोंधळाचा फटका शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचा श्री गणेशा करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचाच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या सुमारे अडीच हजार एवढी असून, ७३ हजार मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी साडेसहा हजार शिक्षक आहेत. त्यातील सुमारे ९०० हुन अधिक पदे रिक्त आहेत.
खासगी शाळांसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडील पालकांचा कल वाढत असतानाच जिल्हा परिषद शाळांचा पट टिकविण्याचे प्रशासनापुढे मोठ आव्हान आहे. यामधून मार्ग काढणे अशक्य झालेले आहे. दोन वर्षापूर्वी अकराशे नवीन शिक्षकांची नियुक्ती केली गेली तरीही निवृत्त आणि परजिल्ह्यांतील बदल्यांमुळे पुन्हा जिल्ह्यातील शिक्षकांची पदे रिक्तच आहेत. त्याला सामोरे जाणे सध्यातरी अशक्यच आहे. त्यामध्ये शासनाने पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीबाबत नवीन धोरण आखल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
६ वी ते ८ वीच्या प्राथमिक शाळांमध्ये १९ पट असल्यास एकच पदवीधर शिक्षक नियुक्त केला जाईल. या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नवीन संचमान्यतेला स्थगिती दिली आहे. या संचमान्यतेवर आधारित नवीन शिक्षक भरती केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची भरती थांबली आहे. नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षकांची उणीव जाणवत आहे. एकट्या लांजा तालुक्यात १०० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रस्तरावर कमी पट असलेल्या शाळांमधील दोन पैकी एक शिक्षक मोठ्या पटाच्या शाळांमध्ये नियुक्त केला जात आहे. त्यामुळे सुमारे ३०० हून अधिक शाळांमध्ये एकच शिक्षक असल्याची माहिती पुढे आली आहे.
कामगिरीवर नियुक्ती देतानाही प्रशासनाकडून चांगले शिक्षक उचलून मोठ्या पटाच्या शाळांमध्ये नेमले जात आहेत. त्यामुळे शिक्षणाची बसलेली घडी विस्कटत असून यावरून ग्रामस्थांमधून आरडाओरड सुरू झाली आहे. शिक्षकच कमी असल्याने लोकप्रतिनिधीही हतबल झाले असून, ग्रामस्थांच्या मागणीकडे कानाडोळा करत आहेत. हा गोंधळ थांबवून नवीन शिक्षक भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी केली जात आहे.
शासनाने सहावी ते आठवीच्या एका वर्गासाठी केवळ एकच शिक्षक नियुक्त केला आहे. त्यामुळे त्या शिक्षकावर सर्व विषय शिकविण्याची जबाबदारी येते, जी प्रत्यक्षात अव्यवहार्य आहे. कोकणासारख्या ग्रामीण भागांतील शाळांमध्ये कमी विद्यार्थी संख्या ही सामान्य बाब आहे. अशा परिस्थितीत शाळांचे एकत्रीकरण शक्य नाही. त्यामुळे शासनाने या वास्तवाचा गांभीर्याने विचार करावा व यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा ही विनंती- संतोष रावणंग, जिल्हा सचिव, राज्य प्राथमिक शिक्षक संघ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 30/Jun/2025














