चिपळूण बाजारपेठेतील १५ तास बत्तीगूल

चिपळूण : बाजारपेठेतील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलाच्या ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला शनिवारी (ता. २८) मध्यरात्री दोनच्या सुमारास मोटारीने धडक दिली. त्यामुळे खांब वाकून तारा तुटल्याने बाजारपेठ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तब्बल १५ तास बाजारपेठेतील बत्तीगूल होती. त्यामुळे व्यापारीवर्गासह रहिवासी हैराण झाले. या अपघातात महावितरणचे मोठे नुकसान झाले; मात्र या विषयी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार झाली नव्हती.

खेडेकर क्रीडा संकुलाच्या बाजूस शिवनदी पुलालगत विद्युतखांब असून, तो मुख्य रस्त्यालगत असल्याने नेहमीच धोकादायक ठरला आहे. अनेक वर्षे शहरातील रस्त्यालगतचे विद्युतखांब हटवण्याची मागणी केली जात आहे; मात्र या मागणीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. काही वर्षांपूर्वी याच विद्युतखांबावर दुचाकी धडकून अपघात झाला होता.

त्यामध्ये २ तरूण गंभीर जखमी झाले होते; मात्र शनिवारी मध्यरात्री याच विद्युतखांबावर एक मोटार धडकली. त्यामध्ये विद्युतखांब वाकल्याने तारा तुटल्या. परिणामी, चिंचनाका ते बाजारपेठदरम्यानच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. शनिवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने वयोवृद्धांसह नागरिकांचे हाल झाले. शनिवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित होता.

मोटारचालकाची भरपाईची तयारी
या अपघातात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही महावितरणकडून संबंधित मोटारचालकाविरुद्ध उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती; मात्र संबंधित चालकाने अपघातानंतर थेट पोलिस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली तसेच महावितरणचे झालेले नुकसान भरण्याची तयारी दर्शवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 30/Jun/2025