लांजा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची अखंड सेवा

लांजा : लांजा शहरातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे वारंवार नळपाणी योजनेच्या पाईपलाईनवर परिणाम होत आहे. पाईपलाईन तुटणे, अडथळे निर्माण होणे, खड्डे पडणे अशा अडथळ्यांवरही मात करत नगरपंचायतीचे कर्मचारी आणि त्यांचे मुकादम नागरिकांना प्रामाणिकपणे अखंड सेवा देत आहेत.

शासकीय कर्मचारी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. सेवेत कार्यरत असताना दैनंदिन शासकीय कामे तसेच जनतेची कामे त्यांनी विनाविलंब प्रामाणिकपणे, कार्यक्षमपणे व पूर्ण जबाबदारीने पार पाडणे अपेक्षित असते.

हाच प्रत्यय नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत येत आहे. गेले अनेक दिवस मुसळधार पावसातही नगरपंचायतीचे कर्मचारी वेगवेगळे अडथळे असूनही नळपाणी जोडणी व दुरुस्तीसाठी काम करत आहेत मुसळधार पाऊस, चिखल, वहाळाचे पाणी, वाहतुकीचा गोंधळ आणि यंत्रसामुग्रीची अडचण असूनही त्यांचा सेवाभाव व कार्यनिष्ठा जबरदस्त दिसते. यामुळेच अडथळ्यावरही मात करून ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, या कर्मचाच्यांच्या प्रयत्नामुळे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पावसातही नियमित पाणीपुरवठा होत आहे. नगरपंचायतीचे हे खरे जलदुत असून, त्यांच्या कार्याबद्दल शहरातून त्यांचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 30/Jun/2025