चिपळूणकरांना ‘एनडीआरएफ’कडून बचावकार्याचे धडे

चिपळूण : आतापर्यंत अनेक महापुरांचा सामना केलेल्या चिपळूणकरांना आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य व पूरपरिस्थिती हाताळण्याबाबत एनडीआरएफ मार्फत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. शनिवारी झालेल्या या प्रशिक्षणात महापुरात बुडणाऱ्यास कसे वाचवावे, आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी, सीपीआर कसा द्यावा, स्वतःचा जीव वाचवितानाच दुसऱ्यांना मदत कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शहरासह तालुक्यात अनियमित पाऊस सुरू आहे; मात्र येत्या काही दिवसांमध्ये जोराचा पाऊस वाढ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसाळा कालावधीत शहरात पुराचे पाणी शिरल्यास आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अशावेळी बचावकार्य, आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं याचं ट्रेनिंग एनडीआरएफतर्फे शनिवारी देण्यात आले. उपविभागीय कार्यालय चिपळूण, तहसील कार्यालय, चिपळूण पालिका आणि एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर शहरातील जलतरण तलावात घेण्यात आले. एनडीआरएफ कमांडर इन्स्पेक्टर प्रमोद राय यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफच्या जवानांनी प्रशिक्षण दिले.

पाण्यामध्ये बुडणाऱ्याला कसं वाचवायचं, आग लागल्यानंतर आपला जीव कसा वाचवायचा, हार्टअॅटॅक आल्यानंतर पेशंटला सीपीआर कसा द्यायचा, याचं प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे अत्याधुनिक सामग्री जवळ नसताना नारळ, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल यांच्या साह्याने बचावकार्य करता येतं, याचे प्रात्यक्षिक जवानांनी करून दाखवले.

या शिबिरात तहसीलदार प्रवीण लोकरे, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, जलतरण तलाव व्यवस्थापक प्रीतम जाधव, अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनातील बोट चालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 30/Jun/2025