नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नागपूर : पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी कशाचीही तमा न बाळगता पाकिस्तानचे दाेन तुकडे केले. तशीच संधी पुन्हा चालून आली होती. देशाचेे सैन्य लढाई जिंकण्याच्या जवळ आले होते.

परंतु नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नाकर्त्या पंतप्रधानांमुळे आपण जिंकलेली लढाई हरलो. ट्रम्पने युध्दबंदी घोषीत करावी एवढी पत विश्वगुरूमुळे भारताची जगात घसरली’ अशी जहीर टीका वंचित बहुजन आघाडी नेते माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. संघाची कुबडी घेऊन राजकारण करणाऱ्या मोदींना ट्रम्पची दादागिरी मोडता आली नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

रविवारी फुले-आंबेडकर इंटेलेक्चुअल फोरमच्यावतीने कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवन येथे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची परिस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरची पोलखोल करीत भारताची जगात झालेली नाचक्की, पाकिस्तानची कायमची जिरविण्याची संधी आणि विरोधकांची मिळमिळीत भूमिका यावर बोचरी टीका केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही लुटपुटूची लढाई आहे. या युध्दात भारत सपशेल हरला आहे. हल्ला दहशतवादी केंद्रातून नव्हे पाकिस्तानातून होत असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. पाकिस्तानचे पाच तुकडे वा नेस्तनाबुत करण्याची मोठी संधी देशाने गमावली. विश्वगुरू जग पालथा घालत आहेत. परंतु, एकाही राष्ट्राला आपल्या बाजूने उभे करू शकले नाहीत. प्रास्ताविक डॉ.सर्जनादित्य मनोहर यांनी केले. संचालन प्रा.डॉ. राजेंद्र डोंगरे यंनी केले. प्रा. अनिकेत मून यांनी आभार मानले.

  • भाजप-संघाचे राजकारण देशासाठी घातक
    संघाचे बोधचिन्ह स्वास्तिक आहे. ते हिटलरला मानतात. दुसरीकडे इस्त्रायलवर अवलंबून आहेत. अर्थात ज्यूंवर अवलंबून आहे. हिटलर व ज्यू यांचा ‘३६’ चा आकडा आहे. संघ याच आकड्याशी खेळत आहे. असे अतात्वीक राजकारण देशासाठी घातक असल्याचे आंबेडकर म्हणाले.
  • फुले शाहू आंबेडकर चळवळीला नेतृत्वाची संधी
    पाकिस्तानची निमींती असो वा देशातील इतरही प्रश्न, यावर कॉंग्रेस, संघ, माकप काहीही बोलणार नाही. त्यांचा नाइलाज आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला नेतृत्व करण्याची संधी आहे. त्यामुळे मौनीवृत्ती सोडा सरकारला थेट प्रश्न विचारा, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 30-06-2025