चिपळूण : तालुक्यातील शिरळ-वैजी-भोम या मार्गावर २२ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरू होणार आहे. यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा केला आहे. शिरळ-भोम मार्गावर २२ वर्षांपूर्वी बससेवा सुरू होती. मात्र, अपेक्षित प्रवासी संख्या नसल्याने आणि येथील मुख्य रस्ता याची दयनीय अवस्था याची कारणे देत चिपळूण आगाराने या मार्गावरील बससेवा बंद केली. मात्र याचा जास्त त्रास या महामार्गावरील असणाऱ्या रेहेळ या गावातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना होत होता. शालेय मुलांना आणि कामानिमित्त चिपळूणला येणाऱ्यांना ३ किमी. पायपीट करावी लागत होती. ती आत्ता थांबणार आहे. त्यामुळे गेली २२ वर्षे येथील लोक बससेवेच्या प्रतीक्षेत होते.
यावर्षी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे या मार्गांवर पुन्हा बससेवा सुरू व्हावी, यासाठी येथील स्थानिक सरपंच शशिकांत राऊत, सरपंच आणि शिवसेना खाडीपट्टा उपविभाग प्रमुख फैयाज शिरळकर, विभागप्रमुख नितीन निकम, रेहेळ वैजीचे सरपंच संदीप जाबरे, उपसरपंच रूपेश शेलार, भोमचे सरपंच मिलिंद शिर्के, हेमंत मोरे, राजू मोरे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आमदार भास्कर जाधव यांना निवेदन दिले होते. जाधव यांनी तात्काळ चिपळूण आगार प्रमुखांना पत्र देऊन ही बससेवा तात्काळ सुरू करावी, असे सांगितले होते. त्यानंतर आगारप्रमुखांनी तत्काळ बससेवा सुरू केली आहे. आजपासून (ता. ३०) ही बससेवा नियमित सुरू होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 30/Jun/2025














