चिपळूण : भरड धान्यापासून महिलांसाठी पदार्थ प्रशिक्षण

चिपळूण : तालुक्यातील भोम शिर्केवाडी येथे दीपक नोवोकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड लोटे यांच्या सहकार्याने भोम पंचक्रोशीतील गावांमधील महिलांसाठी नाचणीपासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. पंचक्रोशीतील भोम, कापरे, वैजी, पोसरे, कालुस्ते आदी गावातील मिळून ५० महिलांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. भोम येथे बेसिक प्रशिक्षण व बारामती येथे अॅडव्हान्स प्रशिक्षण आयोजित केले गेले.

यामध्ये नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी, इत्यादी मिलेटपासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक व माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. सर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जिवाजी बाबुराव राणे स्मृती प्रतिष्ठान चिपळूण यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान कंपनीचे लोटे युनिटमधील सीएसआर विभागप्रमुख अमोल अकुलकर व ओमकेश शिर्के यांनी भेट देवून महिलांशी संवाद साधला. भरड धान्य (मिलेट) विषयी सध्या जनतेमध्ये जनजागृती होत असून अनेक लोक हेल्दी फूड म्हणून भरड धान्य वापरत आहेत. त्यामुळे बाजारात भरड धान्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना मागणी आहे. महिलांना शिकवण्यात आलेले पदार्थ महिलांनी बनवून त्याची बाजारपेठेत विक्री केल्यास त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. या शिवाय राणे प्रतिष्ठानकडून उभारण्यात आलेल्या भरड धान्य प्रक्रिया केंद्रामध्येदेखील प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला भोमच्या सरपंच श्रावणी मोहिते, राणे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्मृती राणे यांच्यासह दीपक नोवोकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड लोटेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 30/Jun/2025