मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे! परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार, १ जुलै २०२५ पासून लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० किमी पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारक प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कशी मिळणार सवलत?
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जून रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार, कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ आरक्षणावर ही सवलत दिली जाईल. ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी लागू असून, केवळ पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाच (सवलतधारक वगळून) याचा लाभ घेता येईल. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा हंगाम वगळता ही योजना वर्षभर सुरू राहणार आहे.
आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवातही लाभ
येत्या आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा विशेष लाभ घेता येणार आहे. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आगाऊ आरक्षण केल्यास प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळेल. तसेच, गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही आगाऊ आरक्षणावर ही सवलत उपलब्ध असेल. मात्र, जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही याची नोंद घ्यावी.
ई-शिवनेरी प्रवाशांसाठी विशेष संधी
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा सर्वाधिक लाभ घेता येणार आहे. प्रवासी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित करून १५% सवलतीचा लाभ घेऊ शकतात. तरी सर्व प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 30-06-2025














