श्रीदेव भैरीचा आषाढी उत्सव: पालखी प्रदक्षिणा आणि बळ कार्यक्रमाचे आयोजन!

रत्नागिरी : ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पारंपरिक पालखी उत्सव आणि बळ कार्यक्रम लवकरच उत्साहात पार पडणार आहे. श्री भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी या उत्सवांमध्ये बारा वाड्यांतील सर्व गावकरी, मानकरी आणि भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पालखी प्रदक्षिणेचा विस्तृत मार्ग:

यंदा श्रीदेव भैरीच्या पालखी प्रदक्षिणेचे दोन प्रमुख दिवस निश्चित करण्यात आले आहेत. पहिली ग्रामप्रदक्षिणा शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी होणार आहे, तर दुसरी ग्रामप्रदक्षिणा रविवार, २० जुलै २०२५ रोजी होईल. दोन्ही दिवशी सकाळी १० वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल.

या पालखीचा मार्ग खालची आळी मार्गे सुरू होईल आणि मुरलीधर मंदिर, काँग्रेस भुवन, टिळक आळी, झाडगाव (पटवर्धन व सावंत खोत यांच्याकडे थांबा), जोशी पाळंद मार्गे परटवणे (खंडकर खोत यांच्याकडे थांबा) असा असेल. पुढे फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंडमधील सहाणेवर पालखी थांबेल. त्यानंतर अठरा हाताच्या गणपती मंदिर मार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी, तेलीआळी (कोतवडेकर सहाणेवर थांबा) असा प्रवास करत परत मारुती आळीतून पऱ्‍याची आळी, धमालनीच्या पारावरून विठ्ठल मंदिर मार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे रात्री १० वाजता पालखी श्री देव भैरी मंदिरामध्ये परत येईल. त्यानंतर गाऱ्हाणे होऊन ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रमाची सांगता होईल.

बळ कार्यक्रम:

या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेला भैरीचा बळ कार्यक्रम बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

हा आषाढी उत्सव रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन श्रीदेव भैरीचा आशीर्वाद घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 01-07-2025