चिपळूण : कापसाळ दिवाणखोरी परिसरात पाच घरफोड्या

चिपळूण : चिपळूण शहरालगतच्या कापसाळ दिवाणखोरी परिसरात पाच घरफोड्या झाल्या. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. याविषयी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार झाली नसली, तरी काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. एक घरफोडीचा प्रयत्न सुरू असताना शेजाऱ्यांना चाहूल लागताच त्यांनी ओरड करताच दोन चोरट्यांनी पलायन केले.

शहरालगतच्या कापसाळ दिवाणखोरी येथे दाट वस्ती असून, महामार्गालगत हा चोरीचा प्रकार घडला आहे. प्रकाश जाधव यांच्या घरीदेखील चोरीचा प्रयत्न झाला; मात्र चोरट्यांची चाहूल लागल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या फुटेजचा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याच परिसरात आणखी चार ठिकाणी चोरीचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

गेल्या तीन महिन्यांपासून चिपळूण शहर व परिसरात सातत्याने घरफोडीचे प्रकार घडत आहेत. भर बाजारपेठेत दोन वेळा घरफोडीचे प्रयत्न झाले. त्यातील एका सुपर बाजारमध्ये उघडपणे चोरटे फिरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. या पाठोपाठ खेंड व राधाकृष्णनगर परिसरातदेखील एकाचवेळी १३ घरफोड्या झाल्या होत्या. त्याचेही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले होते; मात्र मागील दोन वर्षांत या घरफोडीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तसेच त्याचा तपासदेखील आता थांबला आहे. या घरफोडीत चोरीस गेलेला ऐवज हाती लागलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शहर व परिसरात घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 01/Jul/2025