खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने गणपतीसाठी गावी जायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ऑनलाइन तिकीट विक्री पहिल्या तीन मिनिटांमध्ये फुल्ल झाली. पुढच्या तासभरात सर्व गाड्या ‘रिग्रेट’ झाल्याने चाकरमान्यांना प्रतिक्षा तिकीटही मिळाले नाही.
गणेशोत्सव आणि शिमगोत्सवासाठी हे कोकणातील मोठे सण असून, चाकरमानी आवर्जून त्याकरिता गावी जातात. आता नियमानुसार दोन महिने अगोदरच गणेशोत्सवासाठी रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे; परंतु, बुकिंग सुरू होताच पहिल्या दोन ते तीन मिनिटांतच ट्रेन फुल्ल झाल्या. गणेशोत्सव २७ ऑगस्टला सुरू होत आहे त्यानिमित्त २५ ऑगस्टला गावी जाण्यासाठी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना २६ जूनलाही तिकीट मिळालेच नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जायचे कसे, असा प्रश्न चाकरमानी विचारत आहेत.
विशेष गाड्यांही फुल्ल
मुंबई-ठाण्यातून कोकणात तसेच कोकणमार्गे १८ पेक्षा जास्त ट्रेन जातात. या सर्व गाड्या एवढ्या कमी कालावधीत कशा फुल्ल होत आहेत. तिकीट खिडकीवर पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहिल्यावरही केवळ पहिल्या चार प्रवाशांनाच तिकीट मिळते. गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्याबाबतीतही असाच अनुभव प्रवाशांना आहे.
गाड्यांचे डबे वाढवा
गणेशोत्सवासाठी कोकण मूळ गावी जाण्यासाठी चाकरमानी उत्सुक असतात; परंतु ट्रेनमध्ये आसने मर्यादित असते. त्यामुळे वाढत्या मागणीपुढे त्यांची संख्या अत्यंत तुटपुंजी असते. त्यामुळे सर्व गाड्या अवघ्या दोन मिनिटांत भरतात. कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे डबे १६ वरून २२ केल्यास आणखी जास्त प्रवासी सामावून घेता येतील, अशी प्रतिक्रिया अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अक्षय महापदी यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 PM 01/Jul/2025














