महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दुरुस्तीमुळे अपघातांमध्ये घट : खासदार सुनील तटकरे

रत्नागिरी : महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची दुरुस्ती केल्याने २० टक्के अपघात घटले आहेत. अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षा, वेग मर्यादा पालन, मद्यपान विरहीत वाहतूक, स्वयंशिस्त याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्याचबरोबर ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करून बंधन आणावे, अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक काल झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. अपघातांमध्ये २० टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले. खासदार श्री. तटकरे म्हणाले, परशुराम घाटामध्ये दरडी कोसळून होणाऱ्या अपघातांबावत विशेष लक्ष केंद्रीत करावे. त्याबाबतच्या तांत्रिक उणिवा दूर कराव्यात. आवश्यक त्या ठिकाणी फलक लावून सूचना कराव्यात. मोकाट जनावरांमुळे अपघात होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन अधिकारी, मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांनी त्याबाबत उपाययोजना कराव्यात. संबंधित सर्वच विभागांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी पार पाडावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण राहिलेली रस्त्यांची कामे पूर्ण करावीत.

उपप्रादेशिक परिवहन विभागाने ब्रेथ अॅनालाईझरचा वापर करुन मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर बंधने आणावीत.

सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा
कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पावसाचा फायदा घेऊन लोटे परशुराम एमआयडीसीमधील जे कारखाने थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करत आहेत, अशा कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली.

कोकाकोलाने स्थानिकांना रोजगार द्यावा
कोकाकोला कंपनीच्या विरोधात मूकमोर्चा काढणाऱ्या ४०० लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलिस अधीक्षकांनी तत्काळ अहवाल द्यावा. चुकीचे झाले असेल तर हा विषय संपवावा. माझ्या मतदारसंघात अशी चुकीची कारवाई खपवून घेणार नाही. कोकाकोला कंपनीने स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 01/Jul/2025