मंडणगड तालुक्यात पाच धरणे ओसंडून वाहू लागली

मंडणगड : तालुक्यात दमदार पाऊस सुरू असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, तिडे, व्याप्रेश्वर ही मध्यम व लघु आकाराची पाच धरणे तुडुंब भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या धरणात सुमारे २० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तालुक्यात जून महिन्यापासून पाऊस सुरू असून आतापर्यंत ९६१ मिमी पाऊस पडला आहे. मे महिन्यात ४९४ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. पावसाचा फटका घरांना व शेतीला बसला असून आत्तापर्यंत ८ लाखांचे नुकसानही झाले आहे.

मंडणगड तालुक्यात १९७९ साली चिंचाळी हे पहिले धरण झाले. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सर्वांत आधी भरते. तर भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७ घनमीटर आणि तिडे धरणाची ७.५०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. पणदेरी धरण गळतीमुळे नादुरुस्त अवस्थेत असून ते नव्याने बांधण्याच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. तर चिंचाळी आणि भोळवली धरणांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

तुळशी, पणदेरी, चिंचाळी धरणांचे कालवे अपूर्ण अवस्थेत असून देखभाल दुरुस्ती अभावी युजून गेले आहेत. धरणांच्या जलसाठ्याच्या माध्यमातून तालुक्यातील १२६८ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. भाजीपाला उत्पन्नाशिवाय अन्य पिकासाठी पाण्याचा वापर झालेला नाही. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून या ठिकाणी मासे, खेकडी पकडण्यासाठी अनेकजणं गर्दी करीत आहेत.

धबधबे ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण
पावसात नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. कड्याकपऱ्यातील धबधबे सक्रिय झाल्यामुळे पर्यटकांसह स्थानिकही धबधब्यांवर गर्दी करीत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, चिंचाळी, घोसाळे, पणदेरी घाटात रस्त्यांशेजारून सक्रिय झालेले अनेक लहानमोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर धरण परिसरातील दूरवर पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण वाढवत आहे. चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर स्थानिकांसह पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 01/Jul/2025