चिपळूण शहराचा पाणीपुरवठा १४ दिवसांनी पूर्ववत

चिपळूण : शहरात १७जूनला वाशिष्ठी नदीचा प्रवाह वाढल्याने मुरादपूर भागासाठी नदीतून आलेली पाईपलाईन वाहून गेली होती. यामुळे हजारो नागरिकांना दुसऱ्या लाईनवरून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. काहीना टँकरनेही पाणी पुरवले गेले; मात्र शनिवारी पाईपलाईनचे काम झाल्याने तब्बल १४ दिवसांनी अध्र्यां शहराचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू झाला आहे.

गोवळकोट जलशुद्धीकरण केंद्रावरून आलेली पाईपलाईन मुरादपूर-पेठमाप पूलाच्या खालून गेली आहे. ही पाईपलाईन लोखंडाची आहे. ती १७ जूनला वाहून गेली होती. यामुळे मुरादपूर, मिठागरी मोहल्ला, कुंभारवाडा, भोईवाडा आदी भागात पाणीपुरवठा बंद झाला. नदीच्या पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे दुस्तीचे काम करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे दरदिवशी नागरिक पालिकेत येऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करत होते. यामुळे नागरिकांचे ऐन पावसाळ्यात पाण्याविना हाल होऊ नयेत म्हणून खेडों जलशुद्धीकरण केंद्रावरून वडार कॉलनीतून येणारी पाईपलाईन पुढे जोडून या भागाला तात्पुरता कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला होता.

टँकरनेही पाणी पुरवले जात होते. पालिकेचा पाणीविभाग दुरुस्ती करण्यासाठी नदीची पाणीपातळी कधी कमी होतेय, यावर लक्ष ठेवून होता. असे असताना शुक्रवारपासून कोळकेवाडी धरणातून कमी पाणी सोडल्याने व पावसाने उघडीप दिल्याने नदीची पातळी थोडी कमी झाली होती. यामुळे शनिवारी पहाटे ५.३० वाजता दुरुस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी ६ वाजता काम पूर्ण झाल्याने नागरिकांचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मुख्याधिकारी विशाल भोसले, रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 01/Jul/2025